bank of maharashtra

गेटवे ऑफ इंडिया शेजारील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

0

नवी दिल्ली : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळल्या असून, या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ या दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय सुनावला. तब्बल २२९ कोटींच्या खर्चाने उभारण्यात येणाऱ्या या जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईच्या सागरी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारचा हा महत्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वास आल्यास मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा उपलब्ध होणार आहेत. या टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, प्रशासकीय कार्यालये तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यमान जेट्टी टप्प्याटप्प्याने बंद करून त्याजागी नवी जेट्टी कार्यान्वित केली जाणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर गेटवे परिसरातील जलवाहतूक क्षेत्र अधिक बळकट होईल, तसेच मुंबईकरांना वाहतूक कोंडी व गर्दीपासून दिलासा मिळेल. प्रवाशांना आधुनिक टर्मिनल, सोयीस्कर प्रतीक्षालय आणि सुरक्षित प्रवासाचा नवा अनुभव घेता येईल.

गेटवे परिसरातील या प्रवासी जेट्टीला सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दाखवल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने होणार आहे. न्यायालयात या प्रकल्पाविरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या तिन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे नवी प्रवासी जेट्टी उभारणीसाठी आता कोणतेही कायदेशीर अडथळे उरलेले नाहीत.

याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पामुळे गेटवे परिसराचे स्वरूप बदलून त्यास बाधा पोहोचेल, तसेच परिसरातील रहिवाशांना फारसा फायदा होणार नाही, असे आक्षेप घेतले होते. मात्र महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा प्रकल्प केवळ परिसरापुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईकरांसाठी उपयुक्त आहे, असे स्पष्ट केले. मुख्य न्यायाधीश गवई यांनी सुनावणीदरम्यानही नमूद केले की, “मुंबई ही केवळ ताज हॉटेल परिसरापुरती मर्यादित नाही, तर ठाणे, डोंबिवली आणि आसपासच्या नागरिकांनाही या जेट्टीचा लाभ होणार आहे.” न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रवासी जेट्टी प्रकल्पाला वेग येणार असून, सागरी पर्यटन वाढीस लागेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईकरांना गर्दीमुक्त आणि आधुनिक सुविधा असलेला नवा प्रवासी टर्मिनल लवकरच उपलब्ध होणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech