अमरावती : महानायक अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) या लोकप्रिय कार्यक्रमाने नुकताच अमरावतीचा गौरव वाढवला. ७ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नात अमिताभ यांनी विचारले, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या शहरात कबड्डी खेळाचे प्रदर्शन केले ? या प्रश्नाने मंडळाची ऐतिहासिक उपलब्धी पुन्हा चर्चेत आली. केबीसीच्या मंचावर मंडळाचा उल्लेख होताच अमरावतीत उत्साहाचे वातावरण पसरले.
‘कौन बनेगा करोडपती’ ही स्पर्धात्मक मालिका अनेक वर्षांपासून खासगी वाहिनीवर लोकप्रिय आहे. यात १६ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन ७ कोटी रुपये जिंकता येतात. देशभरातील लाखो नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. २८ ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांनी मांडलेल्या प्रश्नात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा उल्लेख अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. अनेकांनी मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके आणि सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके यांच्याशी संपर्क साधून १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकबद्दल माहिती जाणून घेतली.
१९३६ मध्ये जर्मनीतील पर्क साधन आयोजित ऑलिंपिक स्पर्धेत मंडळाचे संस्थापक अंबादासपंत वैद्य यांनी डॉ. सिद्धनाथ काणे आणि डॉ. लक्ष्मणराव कोकडेकर यांच्या नेतृत्वाखाली २५० खेळाडूंची चमू पाठवली होती. या चमूने कबड्डी आणि खो-खो या भारतीय पारंपरिक खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून जगाला आश्चर्यचकित केले. मंडळाला दोन पदके मिळाली होती. ऑलिंपिक समितीचे पदाधिकारी आणि जागतिक व्यायामतज्ज्ञ कार्ल डिम यांनी मंडळाला विशेष निमंत्रण दिले होते. या प्रदर्शनाने जगाला प्रथमच कबड्डी आणि खो-खो खेळांची ओळख झाली, ज्यामुळे भारतीय खेळांचा गौरव वाढला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कबड्डी आणि खो-खो खेळांचे प्रदर्शन करून जगाचे लक्ष भारतीय खेळांकडे वेधले, हा अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण होता.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मिळाली दोन पदके
बर्लिन ऑलिंपिकमध्ये मंडळाच्या २५० खेळाडूंनी भारतीय पारंपरिक खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. जगभरातील खेळाडू आणि प्रेक्षकांनी या खेळांचे कौतुक केले आणि मंडळाला विशेष पदक प्रदान करण्यात आले.