नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतातून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्यासंबंधी अधिकृतपणे एक नोटीस जारी केली आहे. ही दंडात्मक टॅरिफ २७ ऑगस्ट रोजी अमेरिकन स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:०१ पासून लागू होणार आहे. होमलँड सेक्युरिटी विभागाने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, हा नवीन टॅरिफ “रशियन सरकारकडून अमेरिका देण्यात येणाऱ्या धमक्यांच्या” प्रत्युत्तरात लावण्यात आला आहे आणि भारताला या धोरणाचा भाग म्हणून लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियन कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५ टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. याआधी व्यापार तूट या कारणावरून भारतावर आधीच २५ टक्के टॅरिफ लावण्यात आले होते. म्हणजेच एकूण मिळून भारतीय वस्तूंवर आता ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्यात आले आहे. यामुळे नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
रशियन तेल खरेदीबाबत लावण्यात आलेल्या २५ टक्क्यांच्या अमेरिकन टॅरिफच्या दोन दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार (२६ ऑगस्ट) रोजी सांगितले की भारत कोणत्याही आर्थिक दबावाचा सामना करेल, कारण तो आपली लवचिकता मजबूत करत राहील.अमेरिकन टॅरिफवर अप्रत्यक्षपणे टीका करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज जगात आर्थिक स्वार्थाने चाललेली राजकारण आहे, प्रत्येकजण आपली फक्त काळजी करत आहे, हे आम्ही नीट पाहत आहोत.” ते पुढे म्हणाले, “अहमदाबादच्या भूमीतून मी तुम्हाला सांगू इच्छितो, गांधींच्या भूमीतून वचन देतो की लघुउद्योग, दुकानदार, शेतकरी आणि पशुपालक यांचे हित माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचे आहे… दबाव कितीही आला तरी, आपण तो सहन करण्याची ताकद वाढवत राहू.”