bank of maharashtra

भारतीय वायुसेनेतून २१ ला लवकरच मिळणार निरोप

0

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेत ६२ वर्षे अभिमानाने सेवा बजावलेले आणि ‘फ्लायिंग कॉफिन’ म्हणून ओळखले जाणारे मिग-२१ लढाऊ विमान १९ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे सेवानिवृत्त होणार आहे. चंदीगड एअरबेसवर या ऐतिहासिक लढाऊ विमानासाठी निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. १९६३ मध्ये पहिल्यांदा वायुसेनेत सामील झालेले मिग-२१ हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते, जे ध्वनीच्या गतीपेक्षा अधिक वेगाने उडण्याची क्षमता ठेवत होते. ‘पँथर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २३ व्या स्क्वाड्रनमध्ये हे शेवटपर्यंत कार्यरत होते.

मिग-२१ ने १९६५ च्या भारत-पाक युद्ध, १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्राम, १९९९ च्या कारगिल युद्ध आणि २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राइक यांसारख्या अनेक ऐतिहासिक लढायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, या विमानाची कारकीर्द वादग्रस्तही ठरली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०० हून अधिक मिग-२१ विमाने कोसळली असून २०० पेक्षा जास्त वैमानिकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे या विमानाला ‘फ्लायिंग कॉफिन’ आणि ‘विडो मेकर’ असे भयावह टोपणनाव मिळाले.

२०२१ नंतर सात अपघात : अलीकडच्या वर्षांत मिग-२१ च्या अपघातांमध्ये वाढ झाली होती. जानेवारी २०२१ पासून खालीलप्रमाणे सात अपघात झाले आहेत, ५ जानेवारी २०२१ – राजस्थानमधील सुरतगढ येथे अपघात, वैमानिक बचावला, १७ मार्च २०२१ – मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे क्रॅश, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू, २० मे २०२१ – पंजाबच्या मोगा येथे अपघात, वैमानिक ठार, २५ ऑगस्ट २०२१ – राजस्थानच्या बाडमेरमध्ये अपघात, वैमानिक बचावला, २५ डिसेंबर २०२१ – पुन्हा राजस्थानमध्ये क्रॅश, वैमानिक ठार, २८ जुलै २०२२ – बाडमेर येथे पुन्हा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू, ८ मे २०२३ – हनुमानगड (राजस्थान) येथे अपघात, वैमानिक बचावला

कधी नव्हे इतके अल्पसंख्य मिग-२१ सेवेत : १९६० च्या दशकापासून भारताने सुमारे ८५० मिग-२१ विमाने खरेदी केली होती, त्यापैकी सुमारे ६०० विमाने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) देशात तयार केली होती. सध्या केवळ ३६ मिग-२१ विमाने सेवेत असून तीही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. रशिया आणि चीननंतर भारत मिग-२१ वापरणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. जरी रशियाने १९८५ मध्ये या विमानाचे उत्पादन थांबवले, तरी भारताने त्याचे अद्ययावत प्रकार वापरणे सुरूच ठेवले. आता मिग-२१ च्या जागी भारतातच विकसित करण्यात आलेले तेजस एमके१ए लढाऊ विमान ताफ्यात दाखल होणार आहे. मिग-२१ च्या सेवानिवृत्तीनंतर भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपणार आहे आणि नव्या पिढीच्या लढाऊ विमानांकडे वाटचाल सुरू होणार आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech