आरोपींच्या चौकशीत झाले धक्कादायक खुलासे
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या धर्मांतर टोळीचे फरार जिहादी झाकीर अब्दुल करीम नाईकशी कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. झाकीरच्या विविध कंपन्या उत्तरप्रदेशातील टोळीला धर्मांतरासाठी निधी देत असल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर संस्था आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील चौकशी सुरू करण्याची शक्यता आहे. धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जलालुद्दीन उर्फ छांगुर याला परदेशी संस्थांकडून निधी मिळत आहे. एटीएसच्या तपासात याचे सबळ पुरावे सापडले आहेत. स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) आणि बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेतील काही सदस्यांचा धर्मांतर टोळीला परकीय निधी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे. छांगूरच्या टोळीतील सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये १०० कोटींहून अधिक रुपयांचा परदेशी निधी असल्याचे उघड झाले आहे. नेपाळ सीमेवर आयकर विभागाने केलेल्या तपासात अनेक मदरसे आणि धार्मिक स्थळांना दक्षिण भारतीय राज्यांकडून निधी मिळत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. झाकीर नाईक धर्मांतरासाठी ओळखला जातो. भारतातून फरार झाल्यानंतर झाकीरने मलेशियामध्ये आपला तळ बनवला.
धर्मांतर टोळीतील सदस्यांच्या चौकशीदरम्यान, अशीही माहिती पुढे आली की, ही टोळी इंटरनेट मीडियावरील व्हिडिओद्वारे लोकांचे ब्रेनवॉश करत असे. या टोळीतील सदस्यांनी इंटरनेट मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात मुस्लिमांना भडकवणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. ही टोळी व्हिडिओ बनवून लोकांना भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी तयार करत होती. भारतात मूर्तीपूजेला प्रोत्साहन दिले जात दावा देखील त्यात करण्यात आला होता. दरम्यान छांगुर टोळीला होणाऱ्या फंडिंगमध्ये झाकिर नाईकचे कनेक्शन पुढे आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून लवकरच यात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
