मुंबई : विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास आपल्या सर्वांचा आहे असे सांगतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. विधानसभेत नाशिक जिल्ह्याने शंभर टक्के जागा निवडून दिल्या हे मी कधीही नाकारणार नाही असेही अजित पवार म्हणाले. मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, बहुजनांना आपण सत्तेत संधी दिली आहे. जेव्हा आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार घेऊन चालतो त्यावेळी आम्ही या समाजातील लोकांना प्रतिनिधीत्वही दिले आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी वैभव ठाकूर आणि त्यांच्या समवेत पक्षात आलेल्या सर्वांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले. कॉंग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूर यांनी नाशिक जिल्ह्यातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार हिरामण खोसकर, आमदार विजयसिंह पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.