bank of maharashtra

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच आर.जे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

0

मुंबई : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून उद्या २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध पाच आर.जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. उद्या २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दु. २.०० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र भूषण आशा भोसले, प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासह रेडिओ आणि गीत संगीत क्षेत्रातील अनेक मांन्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून प्रथमच अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होणार असून रेड एफएमचे आरजे सिद्धू, मॅजिक एफएमचे, आरजे अक्की, रेडिओसिटीच्या आरजे अर्चना, रेडिओ मिर्चीच्या, आरजे प्रेरणा आणि बिग एफएमचे, आरजे अभिलाष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वय हेनल मेहता करणार आहेत.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात आली होती. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमांला प्रवेश विनामुल्य आहे. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech