पुणे : तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत देशात महाराष्ट्र राज्य प्रथम ठरले आहे. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटक ३५२८, आंध्र प्रदेश २९०५, ओडिशा २६६८ या राज्यांचा समावेश आहे. केंद्राच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी व तपासणीनंतर ओळखपत्रे देण्यात येतात. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या पोर्टलला भेट देऊन ‘अप्लाय ऑनलाईन’ यावर आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेला अहवाल व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.