मुंबई : आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पोलीस योग्य कारवाई करतील, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला,यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘निश्चितच पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे.
या प्रकरणाची पोलीस चौकशी करतील. याच्या करिता तक्रार दाखल करण्याची आवश्यकता नाही. जर दखलपात्र गुन्हा जर होत असेल तर, त्यासंदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील’, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, आमदार गायकवाड त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर आमदार जर खराब जेवणासाठी कॅन्टीनवाल्याला मारहाण करत असेल तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये? तसेच दुसरीकडे, रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले; पण लोकप्रतिनिधी असताना कायदेशीर कारवाई करण्याचे आपल्याकडे अधिकार आहेत. मी गायकवाड यांना समज दिली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.