जलालुद्दीनला ३ वर्षात ५०० कोटी रुपये मिळाले
लखनऊ : भारतातील हिंदुंच्या धर्मांतरणासाठी मुस्लिम देशातून जलालुद्दीन उर्फ छंगुर याला गेल्या ३ वर्षात ५०० कोटी रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. धर्मांतरणाचे रॅकेट चालवणाऱ्या जलालुद्दीनला उत्तरप्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आलीय. या प्रकरणाच्या तपासात मुस्लिम देशातून होणाऱ्या फंडिंगची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, जलालने मागील ३ वर्षांत सुमारे ५०० कोटींचा परदेशी निधी प्राप्त केला आहे. आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी २०० कोटींचा निधी ट्रॅक केला असून उर्वरित ३०० कोटी नेपाळमधील बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नेपाळमधील नवलपरासी, रुपन्देही, बांके आणि काठमांडू या जिल्ह्यांतील १०० हून अधिक बँक खाती वापरून पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि तुर्कीमधून निधी भारतात पाठवण्यात आला. हे पैसे नेपाळमध्ये काढून एजंटमार्फत भारतात जलालुद्दीनच्या नेटवर्ककडे सोपवण्यात आले.
या कामासाठी एजंटना ४-५ टक्के कमिशन दिले जात होते. बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील एजंटांनी देखील हे पैसे भारतात पोहोचवण्यासाठी मदत केली. या निधीचा सर्वाधिक वापर अयोध्येत धर्मांतर मोहिमांसाठी झाल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०२३ मध्ये बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या एका एजंटनेही अशीच माहिती दिली होती, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. नेपाळमधून काढलेले पैसे तेथील चलनात बदलून भारतातील बिनदस्त सीमावर्ती भागांत मनी एक्सचेंजरद्वारे रूपांतरित करण्यात आले. बहरेच, बलरामपूर, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, महाराजगंज आदी ठिकाणी ही देवाण-घेवाण झाली. काही रकमा हवाला मार्गेही भारतात आणण्यात आल्याने त्यांच्या नोंदी मिळणे कठीण ठरत आहे.
नवीन रोहरा या आरोपीच्या ६ बँक खात्यांमध्ये एकूण ३४.२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. जलालुद्दीनची विश्वासू सहकारी नितू उर्फ नसरीन हिच्या ८ खात्यांमध्ये फेब्रुवारी ते जून २०२१ दरम्यान १३.९० कोटी रूपये जमा झाले.तसेच जलालशी संबंधित अन्य स्थानिक खात्यांमध्ये परदेशातून थेट ६ लाख रुपये जमा झाल्याचेही निदर्शनास आले आहे.